अमळनेर पोलीस स्टेशनची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील भूमी अभिलेख कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केलेला ३० हजार रुपये किमतीचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे.
स्टेशन रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात आरोपीने लॅपटॉप चोरून नेल्याची तक्रार अधिकारी स्मिता पोरशा गावित यांनी दि. ३ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान दाखल केली होती. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि दत्तात्रय निकम यांनी तातडीने चोरीचा शोध घेण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ अशोक साळुंखे, पोहेकॉ मिलींद सोनार, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ निलेश मोरे आणि विनोद संदानशिव यांच्या पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान, यापूर्वी अनेकदा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला प्रशांत जगन वाल्डे हा फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
पोलिसांनी प्रशांतवर चार दिवस गोपनीय पाळत ठेवली. तो पुन्हा अंकलेश्वरहून अमळनेरला येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच प्रशांतने लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नवीन भागात लॅपटॉपचे कव्हर फेकल्याचे दाखवून लॅपटॉप तिथेच असल्याचे सांगितले. मात्र, आरोपी सराईत असल्याने पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून अधिक चौकशी केली. त्यानंतर त्याने लॅपटॉप अंकलेश्वर येथे नेल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ अंकलेश्वर येथे जाऊन लॅपटॉप जप्त केला. सुदैवाची बाब म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयातील महत्त्वपूर्ण डेटा लॅपटॉपमध्ये सुरक्षित होता. तपासात समोर आले आहे की, आरोपी प्रशांत अंकलेश्वरहून रेल्वेने ये-जा करून चोऱ्या करतो. अमळनेर पोलिसांनी त्याला अटक करून आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे.









