जळगाव ( प्रतिनिधी ) ;- बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज १७ रोजी राज्यातील जळगाव शहर, जामनेर, पाळधी ,भुसावळ, औरंगाबाद, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाड टाकून अनेक बड्या माश्याना अलगद जाळ्यात घेण्यात आले आहे.पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या १२ जणांना गुरुवारी एकाच वेळी अटक करण्यात आली आहे. यासाठी १५ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.







