नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – नोएडातील पोलीस ठाण्यात एका तरुणाने पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नी भोळ्या लोकांना हनी-ट्रॅपमध्ये अडकवते आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळते. तिने आतापर्यंत अनेकांना हनीट्रॅपचा शिकार बनवले आहे, असे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. आता नवरा असलेला हा तरुण असाच आधीचा तिचा पीडित असून त्याने अशा दबावातच तिच्याशी लग्न केले होते !
तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरुद्ध सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. गौतम बुद्ध नगरमधील डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. एका डेटिंग अॅपवर तरुण या महिलेला भेटल्याचेही उघड झाले आहे. महिलेने अॅपवर नोंदणी करताना सिंगल असल्याचे लिहिले होते. दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि त्यानंतर महिलेने त्याला ओखला येथे भेटायला बोलावले. तेथे दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले.
आरोप करताना दीपकने असेही सांगितले की, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल केले जाऊ लागले. त्याच्याकडून मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली होती. पैसे न दिल्यास दीपकला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याची धमकी देण्यात आली, नंतर दीपकने दबावाखाली येऊन महिलेशी लग्न केले. दीपकने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की महिला आधीच विवाहित आहे. परंतु सोशल मीडियावर ती स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते.
महिला लग्नानंतरही अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग करत असून डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून मुलांशी मैत्री करते. नंतर त्यांना जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोपही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. नंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मोठी रक्कम वसुल करते.