आ. राजूमामा भोळे यांच्यानंतर चिरंजीव विशाल भोळे आता विकासकामांसाठी सज्ज!
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात ‘राजूमामा’ या नावाने परिचित असलेले आ. सुरेश दामू भोळे यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विशाल भोळे हे देखील बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले असून, पित्याप्रमाणेच जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

आ. राजूमामा भोळे यांची ओळख एक ‘सहज उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी’ अशी आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी त्यांचे आपुलकीचे नाते आहे. मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीच्या सुखात किंवा दुःखाच्या प्रसंगात आ. भोळे यांची उपस्थिती कायम असते. “जनतेच्या अडचणी सोडवणे हेच प्रथम कर्तव्य” या भावनेतून त्यांचे घर आणि कार्यालय नागरिकांसाठी २४ तास खुले असते.
राजकारणात वारसा मिळतो, पण विश्वास मिळवावा लागतो. विशाल भोळे यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता महानगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ते कार्य करणार आहेत.
सुखात आणि दुःखात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची भोळे परिवाराची परंपरा आहे. विशाल भोळे यांच्या निवडीमुळे महापालिकेत नवीन ऊर्जा आणि विकासाची दृष्टी मिळणार आहे. अडीअडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी भोळे यांचे कार्यालय हा मोठा आधार बनले आहे. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. राजूमामा भोळे आणि नगरसेवक विशाल भोळे ही पिता-पुत्राची जोडी आता एकाच वेळी शासन आणि प्रशासन पातळीवर सक्रिय झाल्याने शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.









