नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील हृदयद्रावक घटना
मयत दाम्पत्य बऱ्हाणपूर तालुक्यातील, चार मुले पोरकी
जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यात एका रिक्षा अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीला विरह सहन झाला नाही. त्याने नशिराबाद परिसरातील रेल्वे रुळावर जाऊन स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. मात्र या हृदयद्रावक घटनेत या दाम्पत्याची चार मुले उघड्यावर आली आहेत. दरम्यान घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
बऱ्हाणपूर येथील बोदर्डी गावचे दाम्पत्य राजू सोमसिंग राठोड (वय ३५) व त्याची पत्नी संगीता राजू राठोड (वय ३०) हे रावेर तालुक्यातील जिनसी येथे राहतात. गेल्या काही दिवसांपासून राजू राठोड हा जळगाव शहरात कामानिमित्त नातेवाईकांकडे आलेला होता. दरम्यान, संगीता राठोड ह्या मुलांकडे रावेर येथेच होत्या. गुरुवारी संगीता राठोड ह्या प्रवासी रिक्षाने जात असताना रावेर तालुक्यात रिक्षाचा अपघात झाला. अपघातात संगीता राठोड गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना रात्री ८ वाजेनंतर संगीता राठोड यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मयत संगीताचे पती राजू राठोड यांना पत्नीची मृत्यूची बातमी कळताच त्याला मोठा धक्का बसला. प्रचंड विरहात त्यांनी नशिराबाद हद्दीतील रेल्वेरूळ खंबा क्रमांक ४३५/५-७ गाठून रेल्वेच्या खाली स्वतःला झोकून देत जीव दिला. रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन नशिराबाद पोलीस स्टेशनला माहिती दिली. सुरुवातीला अनोळखी असलेल्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली. राजू राठोड याचा मृतदेह सकाळी सापडला. दोन्ही मृतदेहांची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आलेली आहे.
घटनेची माहिती समजताच नशिराबाद सपोनि मोताळे, सफौ हरीश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान राजू व संगीता राठोड यांच्या संसारवेलीवरील चौघे अपत्य हे आता आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. तपास पोहेकॉ अतुल महाजन व पोकॉ आकाश चव्हाण करीत आहे.