पारोळा तालुक्यातील घटना, मयत नंदुरबार जिल्ह्यातील
पारोळा (प्रतिनिधी) : मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन भीषण अपघात पारोळा तालुक्यात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मायलेकाला चिरडले. ही घटना दि. २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
यामध्ये पूनम प्रतिक पाटील (वय २४) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनिल पाटील यांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश आहे. नंदूरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतिक सुनिल पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एमएच ३९, एएच ०४०७) क्रमांकाच्या दुचाकीने मित्राच्या लग्नासाठी आले होते. लग्नकार्य आटोपून हे दाम्पत्य एरंडोल येथे मामांच्या भेटीसाठी जात होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पारोळा तालुक्यातील सारवे बाभळेनाग फाट्याजवळ उन्हामुळे डांबर निघून खडी वरती आल्याने त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीस्वार असलेले दाम्पत्य हे रस्त्यावर कोसळले. याचेवळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ४०, सीटी ४०९७) क्रमांकाच्या टँकरने पूनम व त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वार डॉ. प्रतीक हे रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे ते जखमी झाले आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.