जळगाव तालुक्यात म्हसावद रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा येथून जळगावी येत असलेल्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिली. या भीषण धडकेत जामनेर तालुक्यातील वाकोद येथे राहणारा दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
पवन वैजनाथ मंगरुळे (वय २५, रा. वाकोद ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो वाकोद गावात हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, २ बहिणी असा परिवार आहे. गावातील राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे (वय २५, रा. वाकोद ता. जामनेर) या तरुणासह पवन मंगरुळे हा शनिवारी दि. १ जून रोजी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वावडदा येथून जळगावी जात होता. म्हसावद गावाच्या पुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात पवन मंगरुळे हा जागीच ठार झाला. तर राहुल उर्फ शुभम हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार झाल्यावर राहुल याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वाकोद गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दाखल करण्यास मदत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.