धरणगाव तालुक्यातील वराड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोर शनिवार ३० डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
लक्ष्मण माणिक वाडले (वय-५२, रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. टँकरवर चालक म्हणून ते काम करत होते. दरम्यान, शनिवार ३० डिसेंबर रोजी वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा ताबा सुटला आणि ट्रक थेट नाल्यावरील पुलावरील कठड्यावर धडकली.
या अपघातात चालक लक्ष्मण वाडले हे गंभीररित्या जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पाळधी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.