जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव गुजरी शेतशिवारात आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे तुरीचे पीक, शेतीची अवजारे आगीत भस्मसात झाली आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील सोनूसिंग राठोड यांची देऊळगाव शिवारात कापूस वाडी रोड परिसरात सुमारे साडेआठ एकर शेत जमीन आहे. या सर्व शेतातील सोंगणी केलेले तुरीचे पीक २ दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतातील कांदा चाळ शेड जवळ गंजी मारून ठेवले होते. पीक तयार करण्यास सुविधा होईल म्हणून शेजारील शेतकरी दिलीप मैनाजी वाकोडे यांनीसुद्धा त्यांच्या १ हेक्टर शेतातील तुरीचे पीक याच कांदा शेड जवळ गंजी मारून ठेवले होते. दि. १ फेब्रुवारीचे मध्यरात्री लागलेल्या आगीत सुमारे ५० किंटल तुरीचे पीक जळून खाक झाले.
त्यासोबतच बाजूला असलेल्या कांदा चाळ मधील शेती अवजारे मनुष्यचलित पावर टिलर, डिझेल पंप, तुषार सिंचन सट, ठिबक सिंचन व पीव्हीसी पाईप ९० नग व अनेक प्रकारची शेती अवजारे या आगीत भस्मसात झाली आहेत. सकाळी सोनू सिंग राठोड यांचे परिवारातील सदस्य नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना सदर घटना पाहून धक्काच बसला. या सर्व प्रकाराबाबत महसूल विभाग व पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली असून महसूल विभागाकडून सदर घटनेचा पंचनामा केला.