जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – नागरिकांच्या आणि प्रशासकीय कामकाजाच्या हितासाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दीगंत होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या भेटीप्रसंगी किंवा औपचारिक कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक पुस्तके भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांना करण्यात आले आहे.
या उपक्रमातून मिळालेली पुस्तके शासकीय ग्रंथालये आणि शाळांमध्ये जमा करण्यात येणार असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे. पुस्तके ही कायमस्वरूपी आणि अर्थपूर्ण भेट ठरून वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. भेट देण्यासाठी पुस्तके निवडताना ती दर्जेदार, प्रेरणादायी आणि सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असावीत. पुस्तक भेट देताना त्यावर आपले नाव, तारीख आणि छोटा संदेश लिहिणे ऐच्छिक आहे. ज्यामुळे ती भेट अधिक वैयक्तिक आणि स्मरणीय होईल. या उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.