चाळीसगाव – कोविड काळात जनतेला आरोग्य सेवा पुरवावी यासाठी शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती केल्या होत्या त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी देखील त्याचा मोठा उपयोग झाला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दि.२ जुलै रोजी सायंकाळी आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांनी चाळीसगाव तालुक्यातील तब्बल ३९ कर्मचारी कमी कारण्याचे आदेश दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आज आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत याबाबत मदतीचे आवाहन केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्ही गेली दीड वर्ष रुग्णांची सेवा केली, मात्र आता कोणतीही पूर्वसूचना न देता, चर्चा न करता आम्हाला अचानकपणे कमी करण्यात आले. आमचा रोजगार गेल्याने आता यापुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी त्यांनी आमदार चव्हाण यांच्याकडे केली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व कर्मचारी यांना धीर देत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली, गरज सरो वैद्य मरो अश्या प्रकारची वागणूक सदर कोविड योद्धे यांना मिळाली आहे. गतकाळात दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने व योग्यवेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध न झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला होता. इतर राज्यांपेक्षा देशात सर्वात जास्त रुग्ण व मृत्यू महाराष्ट्रात त्यामुळे झाले. एकीकडे शासन तिसऱ्या लाटेची आम्ही तयारी करत आहोत असे सांगत आहेत, जळगाव जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लादण्यात आले असताना मात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरजेचे असणारे अनुभवी मनुष्यबळ मात्र कमी करत आहे. प्रशासनाची ही भूमिका दुटप्पी व अन्यायकारक असून भविष्यात तिसरी लाट आल्यास त्याचे गंभीर परिणाम जिल्ह्याला भोगावे लागतील. याबाबत आगामी अधिवेशन काळात मंत्री महोदयांना भेटून या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी कोव्हिडं १९ कंत्राटी कर्मचारी यांना दिले.