तरुण कुढापा चौकात संगीतमय श्रीमद् भागवत कथेची सांगता
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथेची मंगळवारी भाविकांच्या उत्साहात शोभायात्रा काढून सांगता झाली. या भव्य शोभायात्रेत महिला पुरुषांसह लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावातील मनपा शाळा क्रमांक ३, पांजरापोळ येथे २५ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथेच्या सातव्या दिवशी कथा व्यास हभप डॉ.विशालशास्त्री गूरूबा यांनी आपल्या सुमधुर वाणीतून सूदामाचे चरित्र कथन केले.
भौतिक सुखाच्या मोहात पडू नका
देवाचा धाक ज्याला कळला तो यशस्वी झाला. भौतिक सुखात पडू नका. पैशाच्या मोहात न पडता एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घ्या, त्याचा सांभाळ करा, बेघर व्यक्तीला निवारा देऊन त्याची गरज पूर्ण करा. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या पैशाचा सदुपयोग करावा. मृत्यूनंतर पैसा संपत्ती सोबत येत नाही. त्यामुळे जिवंतपणी आपल्या हातून सत्कर्म करावे जेणेकरून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल, असेही डॉ.विशालशास्त्री गूरूबा यांनी सांगितले.
यांच्या हस्ते झाली महाआरती
कथेनंतर सुवर्ण व्यावसायिक मनीष जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक विरेन खडके, ललित खडके, गणेश सोनी, पिंटू शर्मा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर ग्रंथ आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तिमय वातावरणात निघाली शोभायात्रा
कथेनंतर शोभायात्रेचे तरुण कुढापा मंडळपासून सायंकाळी ५.३० वाजता सुरुवात झाली. रथ चौक, श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, भाग्यलक्ष्मी चौक, श्रीराम चौक त्यानंतर पुन्हा तरुण कुढापा मंडळात शोभायात्रेची सांगता झाली.
२५० वारकरी बालकांचा सहभाग
शोभायात्रेत वारकरी संप्रदायातील सुमारे २५० बालक वारकरी वेशात सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या आग्रहस्थानी विठ्ठल – रखुमाई रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आलेली होती. ठिकठिकाणी मूर्तीची पूजा करण्यात येत होती. तसेच शोभायात्रेच्या मार्गावर महिलांकडून आकर्षक अशी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी महिला डोक्यावर ग्रंथ आणि तुळसी घेऊन सहभागी झाल्या होत्या. बुधवारी सकाळी १० वाजता गोपाळ काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.