जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला व त्याच्या चुलत भावाला दोन जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यात दोघांना दुखापत झाली आहे. ही घटना दि. ६ मे रोजी तालुक्यातील किनोद येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज रामनाथ पाटील (२०, रा. नंदगाव, ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. राज पाटील व त्याचा चुलत भाऊ कुलदीप पाटील हे दोघे जण किनोद येथे पाणीपुरी खात असताना तेथे किनोद येथील दोन जण आले व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी राज पाटील याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे करीत आहेत.