जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- माझ्या भावाला मेसेज का करतो, या कारणावरून झालेल्या वादातून एका २९ वर्षीय तरुणाला चॉपर आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना कुसुंबा गावात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अविनाश बन्सीलाल पाटील (वय २९, रा. साई कॉम्प्लेक्स मागे, माऊली डेअरी जवळ, कुसुंबा) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कुसुंबा गावातील एका पानटपरीसमोर आरोपींनी त्यांना गाठले. “तू माझ्या भावाला मेसेज का करतो?” अशी विचारणा करत ओम मनोज ठाकरे याने अविनाश यांच्याशी वाद घातला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर तीनही आरोपींनी संगनमत करून अविनाश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी ओम मनोज ठाकरे याने त्याच्या हातातील लोखंडी चॉपरने अविनाश यांच्या डोक्यावर आणि डाव्या हाताच्या बोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्याच वेळी दुसरा आरोपी यश मनोज ठाकरे याने लाकडी दांडक्याने अविनाश यांना मारहाण केली.
या घटनेनंतर अविनाश पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ओम मनोज ठाकरे, यश मनोज ठाकरे, मनोज ठाकरे (सर्व रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









