जळगाव तालुक्यातील जामोद येथे घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) – अपघात झालेल्या भावाला सासरहून पाहण्यास आलेल्या बहिणीला थेट आपल्या भावाचाच मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याची घटना रविवारी १७ रोजी उघडकीस आली आहे. २५ वर्षीय तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून स्वतःला गळफास लावून सकाळी आत्महत्या केली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंकुर नामदेव पाटील (२५, जामोद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो जामोद गावी त्याच्या परिवारासह राहतो. दोन दिवसांपूर्वी त्याचा दुचाकी घसरून अपघात झाला होता. रविवारी १७ रोजी सकाळी अंकुरचे आई-वडील हे शेतात कामाला गेले होते. त्यावेळी अंकुर हा घरी होता. त्याने कुठल्यातरी नैराश्यातून छताला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर त्याची बहीण त्याला, त्याचा अपघात झाला होता म्हणून सासरवरून पाहायला आली. त्यावेळी दरवाजा उघडा पाहून ती आत गेली. तेव्हा भावाने गळफास घेतल्याचे दिसताच, तिने हंबरडा फोडला.
आजूबाजूचे ग्रामस्थ धावत आले. त्यावेळी त्यांनी अंकुर पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून मयत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोहेकॉ लीलाधर महाजन, पोहेकॉ हरीश पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.