शेतकऱ्याचे ३५ हजारांचे नुकसान
पहूर (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील भारूडखेडे शिवारात महावितरणच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे शेती साहित्यासह सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

विलास अर्जुन रायपुरे (वय ५३, रा. भारूडखेडे) यांची भारूडखेडे शिवारात गट क्र. ८० मध्ये शेतजमीन आहे. रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतावरून जाणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यातून ठिणग्या पडून शेतात आग लागली.
या आगीत विलास रायपुरे यांच्या मालकीचे साहित्य जळून खाक झाले. यात २० हजार रुपये किमतीचे नोबेल कंपनीचे २१ ठिबक सिंचनाचे बंडल, १० हजार रुपये किमतीचे २१ पीव्हीसी (PVC) पाईप, ५ हजार रुपये किमतीची विहिरीतील केबल वायर आणि स्टार्टर पेटी असा एकूण ३५,००० रुपयांचा शेतीमाल जळून नष्ट झाला आहे.
शेतकरी विलास रायपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात आग रजिस्टर क्रमांक ०४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी करत आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शॉर्ट सर्किटच्या घटनांमध्ये वाढ होत असून, महावितरणने ढिल्या झालेल्या तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.









