पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिादन
संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान अस्तित्वात राहील. संविधानाला हात लावण्याचा किंवा ते बदलून टाकण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी तो प्रयत्न भारतीय जनता हाणून पाडतील. सामान्यातल्या सामान्य जातीतल्या माणसाला राज्याचा मंत्री होता येत. याचं सारं श्रेय भारतीय संविधानाला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. त्यांच्या प्रति आम्हा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणे देखील महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिपादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान जागर समितीतर्फे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार बापूराव पानपाटील यांनी मानले. याप्रसंगी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, सत्यशोधकी समाजाचे जयसिंग वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, मुफ्ती हारून यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, फारुख शेख, अमोल कोल्हे, ऍड.राजेश झाल्टे, मुकुंद नन्नवरे, दिलीप सपकाळे, सरिता माळी, संदीप ढंढोरे, सुरेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, वाल्मीक जाधव, विनोद रंधे, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ऍड. वाल्मीक सपकाळे, सतीश सूर्यवंशी, भारती बाविस्कर, माजी नगरसेवक राजू मोरे, श्रीकांत बाविस्कर, अशोक लाडवंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी संविधान जागर सायकल रॅली काढण्यात आली. संविधान सभेच्या नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान गौरव रॅली नेहरू चौक, टावर चौक, जुने बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. रॅलीत अनेक स्त्री-पुरुषांचा प्रचंड संख्येने सहभाग होता.