गोदावरी फाउंडेशनच्या अवयव दान परिसंवादात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
जळगाव (प्रतिनिधी) :- अवयवदान आणि देहदान या दोन्ही बाबी पुनरूज्जीवनासाठी पूरक असतात. भारतीय संस्कृतीमध्ये अवयवदानाला पौराणिक महत्व असल्याचे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.


गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयातर्फे डॉ. केतकी पाटील सभागृहात अवयव दानावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर नेफ्रोलॉजीस्ट डॉ. अमित भंगाळे, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, कबचौ उमविचे अधीष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, मल्हारा कम्युनिकेशनचे संचालक आनंद मल्हारा, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. नरेंद्र ठाकूर, अवयवदाना बाबत जागृती करणारे किशोर सुर्यवंशी, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता वैद्य हर्षल बोरोले आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले. त्यानंतर किडनी दान करणार्या लिला कोळी आणि किशोर सुर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. उल्हास पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासात असा कार्यक्रम झालेला नाही. अवयवदान परिसंवाद हा अद्वितीय कार्यक्रम आहे. अपने लिए तो सभी जीते है इस जहाँ मे, जिंदगी का मतलब तो औरो के काम आये असा शेर म्हणत डॉ. उल्हास पाटील आयुष्यात समाजाला अवयवदानाबाबत जागृत करण्याची जबाबदारी आपल्याला स्विकारायची असल्याचे ते म्हणाले. इच्छाशक्तीच्या बळावर किशोर सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. अवयदानाला मोठी पौराणिक परंपरा आहे. महर्षी दधीची यांच्या अस्थिचे शस्त्र इंद्राने वापरून राक्षसांचा संहार केला होता. तेव्हापासून अवयवदानाची परंपरा आहे. परमवीर चक्राचे उगम स्थान दधीची ऋषी असल्याचे त्यांनी सांगितले.
नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. अमित भंगाळे यांनी अवयदानाबाबत सविस्तर माहिती विशद केली. तसेच अवयव दानानंतरची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सत्कारमुर्ती किशोर सूर्यवंशी यांनी त्यांचे अनुभव कथन केले. मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे असे मत डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले. डॉ. अनिल डोंगरे, आनंद मल्हारा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी अवयव दानाबाबतची शपथ ग्रहण केली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. साजीया शेख, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे, डॉ. विशाखा मोराणकर, डॉ. कोमल खंडारे, अमिता निकम, डॉ. कांचन चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, रजीस्ट्रार चेतन चौधरी यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी उपस्थित होते.









