जळगाव (प्रतिनिधी) : दोन दिवसापूर्वीच विश्वकर्मा दिनासह श्रमिक कामगार दिन पार पडला. यात केंद्र सरकारने चार लेबर कोड निर्णायक केले आहेत. यात वेतन कोड तात्काळ लागू करा, औद्योगीक कामगारांना भविष्य निर्वाह निधी तसेच घरेलू कामगारांना पूर्वी १ हजार रूपये दिले जात होते ते बंद करण्यात आले आहेत ते पूर्ववत लागू करावेत, तसेच खरे कष्टकरी कामगार या लाभापासून वंचीत असून नोंदणी केलेल्या बनावट कामगारांऐवजी खऱ्या कामगारांना लाभ देण्याची मागणी करीत भारतीय मजदूर संघातर्फे एक दिवशी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनस्थळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी यांनी भेट दिली. संघटनेचे प्रभाकर बाणासुरे म्हणाले कि, भारतीय मजदूर संघातर्फे शासकिय निमशासकिय तसेच खासगी औद्योगीक अशा विविध आस्थापनात कामगार श्रमीकांना औद्योगिक, आरोग्य तसेच कामाची स्थिती नुसार किमान ५ हजार रूपये पेन्शन, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, पाच वर्षे पूर्ण झालेल्या उद्योगांचे किमान वेतन पुनर्निश्चिती लागू करा. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून लाभ तसेच पेन्शन लाभ, अनुकंपा वारसा, आदि सुविधा लागू करा. असंघटित कामगारांना किमान वेतन, कल्याणकारी योजनांचा लाभ, सामाजिक सुरक्षा लागू करा. आदि न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध संघटनांचे कामगार, प्रतिनिधी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्या न्याय्य असून त्यास काँग्रेसचा पाठींबा आहे. शासनाने त्या मंजूर कराव्यात, अन्यथा हे सरकार घालवून नवीन सरकारकडे या मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल. असे आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी सांगीतले.