दुबई ( वृत्तसंस्था ) – टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून भारताचा मानहानिकारक पराभव झाल्यानंतरआज न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. पाकिस्तानने दोन्ही संघाचा पराभव केल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत.
या स्पर्धेत दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडलाही पाकिस्तानने पराभूत केले आहे. उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले होते. मात्र त्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी भारताचा फिरकीपटू अश्विनला संधी देण्याची दाट शक्यता आहे. कारण आयपीएलमध्ये आणि सराव सामन्यात अश्विनने चमकदार कामगिरी केली होती.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा फलंदाज ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात किशनने धमाकेदार खेळी केली होती. हार्दिक संघात खेळणार की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात हे दोन बदल करण्याच्या तयारीत संघ आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. यापूर्वी बोल्टने अनेकदा भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ केली आहे. 2019च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही कर्णधार विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला होता. तर वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद केले होते.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना आपले उर्वरित चारही सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जो संघ चार सामने जिंकेल त्याला 8 गुण मिळतील आणि निव्वळ धावगती खूप कमी असली तरी त्याचा उपांत्य फेरी गाठण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या मार्गात दोन्ही संघ एकमेकांसाठी सर्वात मोठा अडथळा आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी आहे.