शहरातील गणेश कॉलनी परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रसिद्ध गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या ॲड. प्रताप निकम यांच्या घरात एका चाेरट्याने त्यांच्या डोळ्यासमोरच भरदिवसा डल्ला मारला. घरातून तब्बल १४ तोळे सोने चोरीस गेले आहे. संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. निकम यांनी १ नोव्हेंबर रोजी घरात घरात लक्ष्मीपुजनासाठी १४ तोळे वजनाचे साेन्याचे दागिने व काही चांदीच्या वस्तु देवासमोर ठेवल्या होत्या. रात्रभर पुजा तशीच होती. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ॲड. प्रताप हे घरासमोर मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांच्या पत्नी घरात तर मुलगा वरच्या मजल्यावर होता. ही संधी साधुन एक चोरटा त्यांच्या घरात शिरला. चोरट्याने सर्व दागिने उचलून घेत पलायन केले. चोरटा घराबाहेर निघण्यापूर्वी ॲड. वकील हे घरात आले.
त्यांनी चोरट्याला दोन वेळा पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्याने धक्का देऊन पळ काढला. दरम्यान, घटनेनंतर ॲड. निकम यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.