भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शोककळा, दीड तास रस्त्यावरच पडून !
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर मधील रहिवासी तरुण अंकलेश्वर गुजरात येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जातांना १ जानेवारी रोजी त्याचा अपघातात मृत्यु झाल्याने वरणगाव शहरात छत्रपती शिवाजीनगरमधे शोककळा पसरली आहे.
हितेंद्र प्रकाश सोनार (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वयस्कर आई-वडील, पत्नी, दिड वर्षाची मुलगी, बहीण, काका, काकू, चुलते असा परिवार आहेत. नोकरीस असलेल्या या युवकाचे विज्ञान शाखेतील पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले होते. पाच -सहा वर्षापासुन तो अंकलेश्वर येथील कंपनीमध्ये नोकरीला होता. वरणगाव येथे वृद्ध आई-वडिल मजुरी करून उदरनिर्वाह करीत असतांना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला. तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता. अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते. अडीच वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला असुन त्याला दिड वर्षाची मुलगी सुद्धा आहे.
दिनांक १ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे घरातून ६ वाजता नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जात असताना घरापासून काही अंतरावर मुख्य हायवे रस्त्यावर त्याच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. परंतु रस्त्यावरील कोणीही त्याला मदत न केल्यामुळे तो त्याच ठिकाणी दीड तास पर्यंत पडून राहिल्यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या आई-वडिलांना ही वार्ता तब्बल दिड तासांनी कळाल्यावर ते अपघातस्थळी गेले. त्यावेळी तो आपल्या दुचाकीसह जोरदार वाहतुक असलेल्या महामार्गावर पडलेला दिसला.
तेथे जाऊन आई-वडिलांनी त्याचे तोंडावरील रक्त वगैरे पुसुन साफ केले व आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी हाक दिली. परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही. शेवटी तेथे राहात असलेले वरणगाव येथील महेंद्रसिंग राऊळ व त्यांचा मुलगा अमर राऊळ यांना घटना कळाल्याबरोबर ते अपघात स्थळी मदतीला धावून गेले. त्याला हॉस्पटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह वरणगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत आणण्यात आला. घरातील एकुलता एक मुलगा एवढ्या तरुण वयात गेल्यामुळे आई-वडिलांसह त्याची पत्नी, काका व चुलत्यांवर तसेच बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.









