जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील घटना
मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले सोनू बारेला हे कुसुंबा शिवारातील एका शेतात वास्तव्यास होते. दिनांक १५ मे रोजी ते पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
सोनू बारेला यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. या ठिकाणी सोनू याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या घटनेनंतर मृताचे पुत्र नीलेश सोनू बारेला यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या फिर्यादीच्या आधारे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.