जळगाव तालुक्यात ममुराबाद रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एका रुग्णालयातून काम संपवून घरी परतत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत यावल तालुक्यातील आडगाव येथील ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक ८ रोजी रात्री ११ वाजता ममुराबाद गावाजवळ घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश दिलीप पाटील (वय ३२, रा.आडगाव,ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजेशच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, ८ वर्षाचा मुलगा, ५ महिन्यांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. (केसीएन)राजेश जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयातील पॅथोलॉजी लॅबमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून तो आपल्या दुचाकीने घरी आडगावला जायला निघाला. ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. त्यात राजेशला गंभीर दुखापत झाली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. ममुराबाद येथील काही तरुणांनी रस्त्याला कडेला पडलेल्या राजेशचा मृतदेह पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी राजेशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आडगाव येथील पुरुषोत्तम भालेराव या युवकाला अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर रात्रीच राजेशच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.