जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जुने हायवेवर कांताई नेत्रालयजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला प्राध्यापिका या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता महेंद्र पाटील (वय ३९,रा. रेणुका नगर, जळगाव) या जखमी महिलेचे नाव आहे. त्या एसएमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरीस आहेत. जुन्या हायवेने शुक्रवारी दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी जुपिटर (एमएच १९ सीए ५५१९) ने त्या एसएमआयटी कॉलेजकडून घरी जात असताना कांताई नेत्रालय जवळ भरधाव वेगाने आलेल्या एका कारने क्रमांक (एमएच १९ सीझेड ६६१०) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत महिला प्राध्यापिका नीता पाटील या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व दोन्ही पायाला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या.
तसेच दुचाकीचे नुकसान झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबानुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कार क्रमांक (एम एच १९ सीझेड ६६१०) वरील अज्ञात महिला चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विजय निकम करीत आहेत.