चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : रेल्वे लाइनचे काम करून घराकडे परतणाऱ्या मध्यप्रदेशातील मजुरांच्या डंपर आणि समोरुन येणाऱ्या पीकअप यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन महिला मजूरांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात रात्री अकराच्या सुमारास तालुक्यातील हिरापूर गावाजवळ घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सध्या सुरू आहे. या लाईनवर तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात असताना चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पीकअप वाहनसोबत भीषण समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. यात डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले.
अपघातात सोनीबाई सोमनाथ यादव (वय ३०, रा. तीनगठ्ठा ता. जि. कबिरनाथ, छत्तीसगढ) व सरस्वती रामप्रसाद उईके (वय १७, रा. दानी चिद्राजी ता. जि. दिंडोरी, मध्यप्रदेश) असे दोन महिला मजूर ठार झाले आहेत. तर १० ते १५ जण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी धावले. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.