पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील महामार्गावरील घटना
पोलिसांकडून माहिती घेणे सुरु ; ५ पेक्षा अधिक जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एरंडोल ते पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे सावखेडा होळ गावाजवळ रविवारी दि. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनर व आयशर वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशरमधील इसम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. यात आणखी ५ ते जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून पारोळा पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.
रोहिदास परसराम चव्हाण (वय ४८, रा. मोरगाव तांडा, ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. घरातील तो कर्ता पुरुष होता. बैल खरेदी-विक्री करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)रविवारी दि. २१ जुलै रोजी सकाळी रोहिदास चव्हाण हे धुळे येथून जामनेरकडे बैल खरेदी करून आयशर वाहनाने परत येत असताना पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावाजवळ गोशाळेसमोर एरंडोलकडून धुळेकडे जाणाऱ्या कंटेनरने त्यांच्या आयशरला जोरदार धडक दिली.
या धडकेत आयशरचालक, कंटेनरचालक आणि आयशर मध्ये बसलेले रोहिदास चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता त्यात रोहिदास याना मयत घोषित करण्यात आले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. (केसीएन)तर घटनेत आणखी ५ ते ७ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांच्यावर पारोळा शासकीय रुग्णालय, एरंडोल व धुळ्यात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद नव्हती. पोलीस घटनेची माहिती घेण्याचे काम करीत असल्याची माहिती पीआय सुनील पवार यांनी “केसरीराज”ला दिली.