अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात पती गंभीर जखमी झाला असून पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तालुक्यातील गडखांब येथील रहिवासी मुरलीधर राजाराम पाटील व लता मुरलीधर पाटील हे दोघे दुचाकीवर शेतात दहिवदकडे रविवारी सकाळी निघाले होते. समोरून चोपड्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या यावलच्या बस (क्रमांक एमएच २० बी एल २६५६) ने समोरून जोरदार धडक दिली. मोटरसायकलसह पती पत्नीला तब्बल ५० ते ६० फूट ओढून नेले. मोटरसायकल बस खाली आल्याने लताबाई गंभीर जखमी झाल्याने तिला धुळ्याला हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुरलीधर पाटील यांना अमळनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.