दुबई ( वृत्तसंस्था ) – उपांत्य फेरीसाठी जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ शुक्रवारी टी२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल. फगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे ही विजयी लय कायम राखण्याचे लक्ष्य असेल. भारताला या सामन्यात विजय व नेट रनरेटदेखील सुधारण्याचे आव्हान आहे. त्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आणि दुसऱ्या संघांतील सामन्याचा परिणामदेखील अनुकूल असण्यावर आशा आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून भारताला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची धावगतीदेखील खराब झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना अफगाणिस्तान विरोधात लय सापडली.
पाकिस्तान सलग चार विजयांसोबतच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि न्यूझीलंडदेखील ग्रुप दोनमधून पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. अशात न्यूझीलंड जर, नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर भारतासाठी उपांत्य फेरीची आशा असू शकते. भारतीय संघ सध्या तेच करणार आहे जे, त्यांच्या हातात आहे. विराट कोहली आणि संघाचे लक्ष्य हे स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावरच असेल.