एकच मिशन- जुनी पेन्शन घोषणेने जळगाव शहर दणाणले
जळगाव ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एक सूत्रबद्ध व शिस्तबद्ध आंदोलन संपूर्ण भारतात एकाच वेळी सुरू आहे. “एकच मिशन जुनी पेन्शन”- हे घोषवाक्य घेऊन प्राथमिक शिक्षक संघ एकाच वेळी केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधून घेत आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून निघालेल्या “भारत पेन्शन यात्रेने” आज तारीख 25 रोजी जळगाव शहरात शक्ती प्रदर्शन करत गगनभेदी घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ संपूर्ण देशात वेगवेगळी आंदोलने करीत आहे. त्यात आतापर्यंत- धरणे आंदोलन, नॉक द डोअर , पेन्शन बहाल मोर्चा, यासोबतच शिक्षक संघाच्या अधिवेशनात ठराव करून संघटनेने पेन्शन प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले होते.
सध्याच्या टप्प्यात 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर दरम्यान अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे “भारत पेन्शन यात्रा” देशभरात सुरू आहे. देशाच्या चारही सीमांकडून वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत या चारही यात्रा दिल्ली येथे पोहोचणार आहेत. या देशव्यापी चळवळीचा समारोप 5 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली येथे होणार आहे.
देशभरातून जनजागरण , शक्ती प्रदर्शन करत निघालेली यात्रा आज जळगाव मार्गाने दिल्लीकडे रवाना झाली. या यात्रेच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक संघाच्या जळगाव शाखेतर्फे भव्य मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. जळगाव शहरात अजिंठा रेस्ट हाऊस पासून मोटरसायकल रॅलीला उदय पाटील (सहायक उपआयूक्त), उदय पाटील (ग. स. सोसायटी चेअरमन) यांचे हस्ते झेंडा दाखऊन सुरुवात झाली. टॉवर चौक व मुख्य बाजारपेठेकडून मार्गक्रमण करत दुपारी 12;30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रा जाऊन धडकली.
यावेळी मोर्चेकरी बांधवा तर्फे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.या निवेदनात जुनी पेन्शन, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रूटी दुर करा इत्यादी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी या बाईक रॅलीचे नेतृत्व केले. त्यांचे समवेत कार्याध्यक्ष योगेश इंगळे, सरचिटणीस देवेंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती राणे, महिला जिल्हा सरचिटणीस शुभांगी पाटील महिला कार्याध्यक्ष संगीता पाटील, महिला कोषाध्यक्ष छाया पवार, यांचे सह रामदादा पवार, एच. एच. चव्हाण, अजबसिंग पाटील, सोमनाथ पाटील, अजित चौधरी, आर. डी. पाटील, आंधळे रावसाहेब, सुनिल ढाके, नरेंद्र सपकाळे, अनिल गायकवाड, अजय सोमवंशी, भाईदास पाटील, मंगेश भोईटे, विजय पवार, बापू साळूंके यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.