जळगाव (प्रतिनिधी) – युनिटी ऑफ मुलनिवासी या संघटनेच्या नावाखाली बामसेफ नावाचा, लोगोचा आणि रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून समाजातून मोठ्या प्रमाणावर फंड गोळा करून त्याचा गैरवापर करणाऱ्या कमलाकांत काळे याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शुक्रवारी १६ जून रोजी करण्यात आले.
प्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना देण्यात आले. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी अशोक भाटकर यास पाठीशी घालून त्याला पळून जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या, तपासात दिरंगाई करून न्याय नाकारत फिर्यादी डॉ. विद्या नागावकर यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून फिर्यादीला संभ्रमित करणाऱ्या रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी एपीआय मनोज भोसले यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील डॉ धर्मकारे, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गिरीधारी तपघाले यांच्या जातीयवादी मानसिकतेतून झालेल्या निर्घृण व अमानुष हत्या म्हणजेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे जातीयवादी शक्तीची वाढलेली हिंमत आहे . या सर्व प्रकरणांमध्ये उचित कारवाई होऊन सबंधितांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दुस-या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले.
मोहन शिंदे, देवानंद निकम, मुकुंद सपकाळे, सुमित्र अहिरे,राजु सुर्यवंशी, विजय सुरवाडे, राजेंद्र खरे, सुनिल देहडे, सतिष गायकवाड, अविनाश वानखेडे, प्रमोद पाटील, मिलिंद सोनवणे, अशोक कोळी, खुमानसिंग बारेला, जगदीश सपकाळे, मदन शिरसाटे, योगेश कोळी, भिका कोळी, अमजद रंगरेज, डॉ.शाकीर शेख, विनोद अडकमोल, प्रमोद सौंदळे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.