कल्याणकारी मंडळातर्फे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तूंच्या संचांचे वितरण आता नवीन सुधारीत कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास प्रारंभ होणार आहे.
मंडळाने बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली असून, संबंधित कामगारास केवळ त्यांच्या नोंदणी असलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच संच प्राप्त करता येईल. प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातीलच वितरण केंद्रावर संच दिला जाईल. बांधकाम कामगाराने संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करायचे आहे. जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी संच घेतलेला असेल, तर तो योजनेस अपात्र ठरेल.
पात्र कामगार आपल्या सोयीने दिनांक व केंद्र निवडू शकतो. त्यानंतर त्याला नोंदणी पत्र मिळेल. हे पत्र, आधार कार्ड/मंडळ ओळखपत्र घेऊन कामगाराने दिलेल्या दिनांकास संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक ओळख व ऑनलाइन फोटो घेण्यात येईल. त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच दिला जाईल. संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याने मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व नोंदणी पत्र घेऊन ठरवलेल्या दिवशी वितरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी व ऑनलाईन छायाचित्र घेण्यात येणार असून त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच ताब्यात दिला जाईल. मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक कुटुंबास (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच संच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच, केंद्रात दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वितरण प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून, कोणत्याही स्वरूपात शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वितरणाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर मंडळाचे प्रतिनिधी व नियुक्त संस्थेचे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. आवश्यक सुविधा जसे संगणक, इंटरनेट, वीज, पिण्याचे पाणी इत्यादींची जबाबदारी नियुक्त संस्थेवर असेल. या संदर्भात अधिक माहिती व अपॉइंटमेंटसाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.