जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पगार जमा होणाऱ्या सर्व खातेदार ग्राहकांना वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण व्हावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी जळगावची अनेक महिन्यांपासून आहे. आता नुकत्याच आलेल्या माहिती नुसार राज्यातील काही जिल्हा बँकांनी बँकेतील पगारदार-खातेधारकांना विमा संरक्षण देऊन दिलासा दिला, तरी आपण सुद्धा संबंधित एजन्सी सोबत बोलून बँकेत पगार जमा होणाऱ्या सर्व पगारदार खातेधारक ग्राहक यांच्यासाठी व बँकेच्या सर्व सेवक यांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण योजना लागू करावी, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेला मंगळवारी निवेदनाद्वारे भाजप शिक्षक आघाडीने दिली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, विमा सरंक्षण योजनामध्ये शासकीय, निमशासकीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बँकेचे सेवक, विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे सचिव इ. कर्मचाऱ्यांचा समावेश करावा . त्यामुळे विमाधारकास अपघातामुळे मृत्यू , कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमा संरक्षण उपलब्ध होईल. अकोला, सातारा, पुणे येथे सदर योजना टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कं. लि. पुणे यांच्या मार्फत राबविले जाणार आहे. सदर योजनेत उत्पन्नाच्या दहा पट विमा संरक्षित केला जाईल. ग्राहकास प्रति एक लाख – २२ रु. प्रिमियम द्यावा लागणार आहे व त्याचे क्लेम तसेच निकष असतीलच.
त्यानुसार जे.डी.सी.सी. बँकेने राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर एस.जि.एस. पॅकेज द्यावे,अशी मागणी भाजपा शिक्षक सेल जळगाव यांच्या वतीने केली आहे.
या वेळी भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव, जिल्हा बँकेचे एम. डी. जितेंद्र देशमुख, संचालक हेमंत साळुंखे व भाजपा पदाधिकारी अनंत पाटील, पी.एल.हिरे, विशाल पाटील, सतीश भावसार, पी. एस. पवार, विजय पाटील एस.बी.कुलकर्णी, विजय गिरनारे, किरण पाटील, एन. आर. दाणी उपस्थित होते.







