जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहात काही राजकीय व्यक्तींकडून एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची पोस्ट सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे . याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आज भाजप लोकप्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहात काही राजकीय व्यक्तींकडून एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे . त्यामुळे सगळीकडे संभ्रमाचे आणि संशयाचे वातावरण आहे. या अत्याचारात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. काही न्यूज पोर्टल्सवर अशा आशयाच्या बातम्याही माझ्या वाचनात आल्या आहेत . या बातम्यांमध्येही लोकप्रतिनिधी आणि आमदार असा उल्लेख असल्याने तमाम जनता संभ्रमात आहे . माहिती मिळाल्यावर प्रसारित करणे हे पत्रकारांचे काम असले तरी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे अधिकार असलेल्या पोलीस यंत्रणेकडून मात्र काहीच अधिकृत खुलासा अजून झालेला नाहीय . पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या बातमीची गंभीर दखल घ्यावी आणि सत्य व तथ्य जनतेसमोर मांडावे पोलीस अधीक्षक या नात्याने जाहीर खुलासा करावा , अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .
यावेळी भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन , आमदार मंगेश चव्हाण , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार , भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , नगरसेवक भगत बालाणी , अरविंद देशमुख , पितांबर भावसार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.