जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतकऱ्याने शेतातील घरात कर्जबाजारीपणाला कंटाळून छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमंत श्रीपत खाचणे (वय ४५, रा.भादली बुद्रुक ता. जि. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील यांच्यासह राहत होते शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, त्यांच्यावर शेतीचे व घराचे कर्ज झाले होते. व हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यातूनच त्यांनी बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी शेतातील घरामध्ये कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
कुटुंबीयांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे भादलीच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. सदर घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.