तहसीलदारांना निवेदन सादर
भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून तसे निवेदन निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी अतिवृष्टी व बोंडअळीने त्रस्त केले असून कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. खासगी कापूस खरेदीदारही कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
भडगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने इतर तालुक्यातील केंद्रावर कापूस विक्रीसाठी नेताना येणारा वाहतूक खर्च न झेपणारा आहे. तसेच त्या केंद्रावर भडगावातील शेतकऱ्यांना सापत्न वागणूक दिली जाते.मागच्या वेळी भडगाव शहरातील जिनिंगमध्ये महाराष्ट्र पणन महासंघाची खरेदी सुरू होती. मात्र, यावर्षी तालुक्याला टाळण्यात आले आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पाचोरा व भडगाव मार्केट कमिटी एकच असल्याने पाचोऱ्यातील सीसीआय खरेदी केंद्र हे आठवड्यातील काही दिवस भडगाव शहरातील जिनिंगमध्ये सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी अनिल पाटील, रमेश शिरसाट, सागर परदेशी, आकाश कंखरे, दीपक महाजन, धर्मराज शिंदे, दीपक पाटील, रवींद्र देवरे, सुरेश पाटील, दिनेश देवरे, माधवराव पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.