परिवर्तन मेळाव्यात विरोधकांवर जोरदार टीका
भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा, अनुदानाचा आणि विकासकामांचा अपेक्षित लाभ मिळत नाही, हे या तालुक्याचे दुर्दैव असून येत्या निवडणुकीत भडगाव नगरपालिकेत भाजपाचे उमेदवार विजयी होऊन परिवर्तन घडवतील, असा ठाम विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

भडगाव येथे शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजता लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात भाजपाच्या वतीने नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील विकासकामांचा अभाव, शेतकऱ्यांच्या समस्या आणि राजकीय अकार्यक्षमता यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना योजनांचा पुरेपूर लाभ मिळतो, पण भडगाव तालुक्यात तसे होत नाही. लोक आता म्हणत आहेत की आम्हाला चाळीसगाव तालुक्यात समाविष्ट करा. ही स्थिती बदलण्यासाठी भाजपाचे उमेदवार निवडून आणा आणि विकासाचे नवे पर्व सुरू करा.”
यावेळी आमदारांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, “मी आमदार किशोर पाटील यांना मित्र मानले होते, पण त्यांनी ते नाते टिकवले नाही. त्यांच्या कुटुंबाला जे स्थान मिळायला हवे होते ते मिळाले नाही. वैशाली ताई, तुमची भाऊबीज यंदा आमदार भावासोबत झाली नाही, पण मी तुमच्या सोबत आहे,” असे म्हणत त्यांनी स्थानिक राजकारणातील सूचक संदर्भ देत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांनी पुढे सांगितले की, “गिरणा नदीवर सात नवीन बंधारे मंजूर केले असून त्यांची कामे लवकरच सुरू होतील.”
व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, निर्मस सीड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, भाजपाचे नेते अमोल शिंदे, जिल्हा बँक संचालक प्रताप पाटील, चाळीसगाव बाजार समितीचे माजी सभापती कपील पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अमोल शिंदे यांनी भाषणात सांगितले की, “भाजपातील चारही नेते एकत्र आले आहेत आणि याचा मोठा धक्का विरोधकांना बसला आहे. आमदार किशोर पाटील यांचे कार्यकर्ते वाळू चोरी, सट्टा, पत्ता आणि गुंडशाहीत गुंतलेले आहेत. आता जनता या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल आणि नगरपरिषदेवर भगवा फडकवेल.”
वैशाली सुर्यवंशी यांनी शहरातील अस्वच्छता, खराब रस्ते, निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचाराचा समाचार घेत म्हटले की, “भाजपाने विकासाचे आश्वासन नाही तर वास्तव बदल घडवायचा आहे.”
माजी आमदार दिलीप वाघ यांनीही आमदार किशोर पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “भडगाव आणि पाचोरा शहरांचा पाणीप्रश्न अद्याप सोडवला गेला नाही. वाळू, सट्टा आणि गुंडशाही हे आमदारांच्या कार्यकर्त्यांचे ‘उद्योग’ झाले आहेत. त्यांनी घेतलेला ‘निर्धार मेळावा’ म्हणजे खरेतर ‘गद्दार मेळावा’ आहे,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत भाजपानेच मेहनत घेऊन त्यांना विजय मिळवून दिला, आणि आता तेच भाजपाला दोष देतात. यावेळी भडगाव नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आणून भगवा झेंडा फडकवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
परिवर्तन मेळाव्यातील सर्व वक्त्यांनी एकमुखाने आवाहन केले की, भडगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल, तर भाजपाच्या उमेदवारांना विजयी करून परिवर्तन घडवावे.









