आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश
भडगाव (प्रतिनिधी): शासनाने अतिवृष्टीने बाधित तालुक्यांसाठी जाहीर केलेल्या सुधारित यादीमध्ये अखेर भडगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, आता भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नवीन निकषांनुसार नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कापूस, मका, केळी, सोयाबीन अशा प्रमुख पिकांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन भडगाव तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली होती.
मात्र, ९ ऑक्टोबर रोजी शासनाने जाहीर केलेल्या यादीतून भडगाव तालुक्याचे नाव वगळण्यात आले होते, त्यामुळे विरोधकांनी आमदारांवर टीका करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच, आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क साधून भडगाव तालुक्यावर होत असलेला अन्याय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीत भडगाव तालुक्याचा यादीत समावेश करून घेईन, अन्यथा आंदोलन करण्याची वेळ आल्यास तेही करू. त्यांनी २४ तासांत मंत्रालयात पाठपुरावा केला.
मुख्य सचिवांच्या संपर्कात राहून त्यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, काल रात्री उशिरा शासनाने सुधारित जीआर (सरकारी निर्णय) काढून त्यात भडगाव तालुक्याचा समावेश केला. या निर्णयामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या कामामुळे ‘आप्पा है तो मुमकिन है!’ यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, शेतकरी वर्गाकडून त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.