भडगाव शहरात आदर्श कन्या विद्यालयात घडली घटना
भडगाव (प्रतिनिधी) : शहरात मंगळवारी दि. १६ डिसेंबर रोजी येथील आदर्श कन्या शाळा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन बालकांचा तोल जाऊन ते शाळेच्या संरक्षण भिंतीवरून थेट नाल्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून पालक संतप्त झाले आहेत.
या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी पहिला बालक अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने), रा. आदर्श कॉलनी, भडगाव येथील, तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने), रा. बालाजी गल्ली, भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या आवारालगत असलेल्या नाल्याला कोणतीही मजबूत सुरक्षा भिंत, कठडे अथवा आडोसा नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नर्सरीत शिकणारी ही बालके वर्गाबाहेर कशी गेली, त्यावेळी शिक्षकांची देखरेख का नव्हती, तसेच इतक्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाने कोणतीही ठोस व्यवस्था का केली नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन्ही बालके नाल्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बराच वेळ शोधाशोध सुरू असताना नाल्यातील पाण्यात फुगून आलेल्या अवस्थेत दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले. ही बातमी समजताच पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर घटनास्थळी आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित शाळा व्यवस्थापन, शिक्षक व जबाबदार घटकांवर सदोष मनुष्यवधासह कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व शाळांच्या सुरक्षिततेचे ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पालक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात शोककळा पसरली असून, दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.









