रावेर तालुक्यात अजनाड येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- सीमेलगतच्या बहादरपूर येथील विटांचे व्यापारी यांचा दि. १८ रोजी तालुक्यातील अजनाड शिवारातील एका विहिरीत गंभीर दुखापत असलेला मृतदेह आढळला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशोक आनंदा प्रजापती (वय ४७) असे मयत इसमाचे नाव आहे. अ शोक प्रजापती (रा. बहादरपूर, ता.जि.बऱ्हाणपूर) यांनी त्यांच्या पुतण्यास नागुरखेडा ता. बऱ्हाणपूर येथील एकाने पैसे घेण्यासाठी बोलावले असल्याचे सांगून ते दि. १८ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घरून गेले. काही वेळातच ११:५५ वाजता त्यांनी त्यांचा पुतण्या रघुनाथ प्रजापती यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून सांगितले की, ‘हे मला इथे मारतायं तू लवकर ये….’ पूर्ण बोलण्याच्या आतच फोन कट झाला. त्या पार्श्वभूमीवर रघुनाथ प्रजापती, मयताचा मुलगा आणि नातेवाईक मोटारसायकल घेऊन मदतीसाठी निघाले.
त्यांना अजनाड शिवारातील गोपाळ तुकाराम पाटील उर्फ बाळू पाटील यांचे अजनाड शिवारातील नागोई नदीकाठी असलेल्या विहिरीवर मोबाइल व खाली एक चप्पल पडल्याचे आढळून आले. रघुनाथ यांनी रावेर पोलिस स्टेशनला खबर दिली असता, सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, फौजदार घनश्याम तांबे, व सहकारी यांनी घटनास्थळी येत पंचनामा करून विहिरीतून प्रेत काढले. अशोक प्रजापती यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत पाहून फिरते न्यायवैद्यकशास्त्र पोलिस पथक पाचारण करून काही नमुने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविला.