जळगाव (प्रतिनिधी) – माजी आ. एकनाथराव खडसे यांच्यावर २०१६ साली बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरील खटला आता सुरु झाला आहे. सोमवारी १९ जून रोजी न्यायालयातील पहिल्या तारखेला फिर्यादी आ. एकनाथराव खडसे हजर झाले. तर, लवकरच खालच्या स्तरावरचे आरोप करणाऱ्या आ. मंगेश चव्हाण यांच्यावरही न्यायालयात खटला दाखल करणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे २०१६ साली राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री होते. तर आ. एकनाथराव खडसे हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी बेताल वक्तव्य केले होते. कुठलाही पुरावा नसताना, सूतगिरणीसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारकडून पैसा लाटला. पॉलीहाऊससाठी एकाच दिवसात अनुदान मंजूर करून घेत मोठ्या प्रमाणात अनुदान घेतले अशा व इतर स्वरूपात खडसेंवर गुलाबराव पाटील यांनी आरोप केले होते.
याबाबत न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काही सुनावणी झाली. मागील कालखंडात गुलाबराव पाटील आणि त्यानंतर आ. खडसे हे देखील काही तारखांना न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. हे प्रकरण प्रलंबित राहिल्याने नंतर सेशन कोर्टाने प्रकरण खारीज केले. त्यानंतर उच्च न्यायालयात आ. खडसे यांनी दाद मागितली. तेव्हा खंडपीठाने, प्रकरण सुरु ठेवा म्हणून निकाल दिला.
त्यानुसार हा खटला सुरु झाला आहे. आ. खडसे यांनी सोमवारी १९ रोजी जळगाव न्यायालयात शपथपत्र सादर करून न्यायालयाची फी भरली आहे. पुरावा नसताना बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. काही दिवसांपूर्वी आ. मंगेश चव्हाण यांनीदेखील माझ्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर क्रिमिनल केस उद्या दाखल करणार असल्याची माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.