सकल लेवा समाज विकास कार्यशाळेत संकल्प
जळगाव ( प्रतिनिधी ) – शैक्षणिक उन्नतीच्या बळावर लेवा समाजाने आपली प्रगती साधली आहे. त्यामुळे आपला कष्ट करणारा समाज आज सधन झाला आहे. मात्र समाजात आज सगळ्यात मोठी समस्या ही बेरोजगारीची आहे. या बेरोजागारीला प्रतिउत्तर देण्यासाठी स्वयंरोजगाराच्यादृष्टीने आगामी काळात दमदार पाऊले टाकण्याचा संकल्प डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका कार्यशाळेत करण्यात आला.
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे यांच्या माध्यमातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात सकल लेवा समाज विकास संकल्प कार्यशाळेत विविध विषयांवर मंथन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन कुटुंबनायक ललित पाटील, अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल जावळे, सचिव अॅड. संजय राणे, भुसावळचे अध्यक्ष सुहास चौधरी, जळगावचे अध्यक्ष माजी महापौर विष्णू भंगाळे, संभाजीनगरचे अध्यक्ष अंजन नरहर पाटील, पुण्याचे अध्यक्ष संजय झोपे, नाशिकचे अध्यक्ष संजय वायकोळे, मुंबईचे अध्यक्ष तुकाराम नेहते, गुजरातचे अध्यक्ष ईश्वर सरोदे यांच्या हस्ते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि स्व. रमेश विठू पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कवी भानू चौधरी लिखीत निर्धार गीत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी म्हटले. कुटुंबनायक ललित पाटील यांचा गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. प्रशांत वारके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यशाळेला मान्यवरांनी संबोधित केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रणिता झोपे यांनी केले.
समाजाची सेवा हीच परमेश्वर सेवा – डॉ. उल्हास पाटील
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, लेवा समाजाचा सुवर्णकाळ टिकवून ठेवण्यासाठी विकासाचा संकल्प करावा लागणार आहे. आपल्यासमोर आता आव्हाने मोठी आहेत. सध्याचे युग हे टेक्नोसेव्ही आहे. त्यामुळेच आपण भोरगाव लेवा पंचायतची वेबसाईट तयार करून काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण लव-कुशाचे वंशज आहोत. प्रस्थापित कवींच्या रांगेत आपल्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या सर्वोच्चस्थानी आहेत. धार्मिकतेच्या क्षेत्रातही आपला समाज कायम अग्रेसर राहिला आहे. ही पंचायत केवळ वैवाहिक प्रश्न सोडवत नसून विविध समाजोपयोगी उपक्रम देखील राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, लेवा समाजाच्या प्रगतीत स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी, बाळासाहेब चौधरी, जे.टी. महाजन, जी.डी. बेंडाळे अशा अनेक महान विभूतींचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे हा आपला समाज आज प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. एरायच्या युगात जॉब क्रिएशन अर्थात रोजगाराची निर्मिती हे मोठे आव्हान आता समाजासमोर उभे राहिले आहे. 2018 च्या अधिवेशनात माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी स्वयंरोजगाराची संकल्पना मांडली होती. नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराच्यादृष्टीने आपल्याला काम करावे लागणार आहे. कारण समाजाची सेवा हीच परमेश्वर सेवा असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.
कुटुंबव्यवस्था टिकविण्याचे आव्हान – शिरीष चौधरी
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे ही संस्था मातृसंस्था आहे. अनेक विभूतींनी या पंचायत मंडळाला दिशा देण्याचे काम केले आहे. 1984 मध्ये लेवा पंचायतीने हुंडा प्रथेविरोधात पाऊले टाकली. आजच्या काळात बेरोजगारी, विखुरलेली कुटुंबव्यवस्था, वाढते घटस्फोटाचे प्रमाण यामुळे समाज अस्वस्थ झाला आहे. शिक्षणामुळे आपल्या समाजाची उन्नती झाली असली तरी नाती आणि मातीशी नाळ तुटत चालल्याचे दिसून येत आहे. शहरीकरणामुळे गावातील 50 टक्के घरे बंद आहेत. गावाशी असलेली नाळ कशी कायम ठेवता येईल यासह उद्योग उभारणीवर काम करावे लागणार असल्याचे मत भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेचे उपाध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.
उद्योजकांनी एकजूट होऊन खासगी एमआयडीसी उभारावी- आमदार भोळे
आपण समाजाचे उत्तरदायी म्हणून काम करीत असतो. हे काम करतांना सर्वात आधी देश, मग समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्याच्या काळात मुलांचे लग्न आणि बेरोजगारी ह्या दोन गोष्टींवर काम करावे लागणार आहे. आपण ओबीसी संवर्गात येत असल्याने अन्यायाची भावना निर्माण होते. परंतु शासनाने लेवा महामंडळाची घोषणा केली आहे. त्याबाबत पत्रव्यवहार होऊन लवकरच त्याची निर्मीती होणार आहे. तसेच समाजातील उद्योजकांनी एकत्रित येऊन खासगी स्वरूपात एमआयडीसी उभारल्यास सरकारकडून पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे काम करू अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तसेच पुणे आणि नाशिक येथे लेवा समाजाचे वसतीगृहासाठी शासनाकडून जागा मिळवून देण्याचा मानस असून जागा मिळाल्यानंतर वास्तू उभी करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठीतांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आमदार सुरेश भोळे यांनी केले.
लेवा पंचायतीचे विकासाचे धोरण – आमदार जावळे
पुर्वी भोरगाव लेवा पंचायतीकडे केवळ वाद मिटविणारी संस्था म्हणून पाहिले जात होते. आता मात्र लेवा पंचायतीने विकासाचे धोरण स्विकारले असल्याचे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. तसेच समाजाच्या उत्थानासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.










