जिल्हा परिषदेत मनरेगाची बैठक उत्साहात
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) बाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यामध्ये प्रत्येक गावात किमान ५० जलतारा कामे, १० शोषखड्डे किंवा विहीर पुनर्भरण कामे, तसेच ५ नाडेप व वर्मी कंपोस्ट युनिट्स उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून किमान १ हेक्टर संपूर्ण संरक्षणाचे काम हाती घेऊन त्या गावातील बेरोजगारांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
सन २०२५ च्या पावसाळ्यात झालेल्या वृक्षलागवडीच्या कामांवर मनरेगा योजनेतून तीन वर्षे देखभाल, संरक्षण व पाणी देण्यासाठी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. यासोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तक्रार निवारण व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
जिल्ह्यातून मजुरीसाठी इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर स्थलांतर करणाऱ्या मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले. या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी (नरेगा), जिल्हा समन्वयक, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.







