यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या एका ४३ वर्षीय प्रौढाचा मृतदेह गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या पाठीमागील शेत विहिरीत आढळला. रविवारी सकाळी त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
चिंचोली गावातील रहिवासी बाळू उर्फ गौरव धोंडू कोळी (वय ४३) हा बुधवार दि. १२ मार्चपासून आपल्या घरातून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना तरुणाचा मृतदेह चिंचोली गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या मागील गोकुळ पाटील यांच्या शेत विहिरीत आढळला. रविवारी मृतदेह विहिरीत दिसून आल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, हवालदार योगेश खाडे करीत आहेत.