जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – चप्पल आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला आणि गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २९ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या बांधावर आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, मध्यप्रदेश, ह. मु. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता. २६ जुलै रोजी तो पत्नीला “मी गावात चप्पल आणायला जातो” असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण तो कुठेही मिळून आला नाही.
गुरुवार, ३१ जुलै रोजी सकाळी नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागे असलेल्या आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर रामू वास्कले याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, हा मृतदेह पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रामू वास्कले याचाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.