जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या एका प्रौढाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खिश्यातील क्यूआर कोडच्या माध्यमातून मयताची ओळखी पटली आहे. एमआयडीसी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
संतोष वामन नेरपगार (वय ५९ रा. लेकसीटी अपार्टमेंट, शिरसोली रोड, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. शिरसोली रोडवरील लेकसीटी अपार्टमेंट येथे संतोष नेरपगार हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. टेलर काम करून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना मिळून आला.
याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की ते पाण्यात पडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.