जळगाव जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्रे बाळगणारे तसेच अवैध शस्त्रे पुरवठादारांना शोधून काढा. वॉन्टेड- फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस ठाण्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी टाका. यासह अनेक महत्वपूर्ण सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.
बुधवार दि. ३ एप्रिल रोजी मंगलम हॉल येथे आयजी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सुचना व मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधिक्षक(गृह), सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणूक पुर्व तयारी आढावा, प्रतिबंधक कारवाई, समन्स/ वॉरंट बजावणी, जिल्ह्यातील बॉर्डर वरील चेक पोस्टचा पोलीस ठाणे निहाय आढावा, त्यात कर्मचारी नेमणूक, वाहन तपासणी, चोरवाटाना प्रतिबंध, २४ तास पहारा याबाबत आयजी डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी सूचना दिल्या.