डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव केला. ज्यो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन, कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये आतापर्यंत विजय मिळवला आहे.
जो बायडेन यांच्या या राजकीय काराकिर्दीची सुरुवात ४८ वर्षांपूर्वी झाली. १९७२ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकन सिनेटसाठी निवडून गेले होते. तेव्हा सीनेटवर निवडून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला गेला. आणि आता ते सर्वात वयस्कर राष्ट्राध्य़क्ष होतील. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते. महत्त्वाचं म्हणजे ओबामा यांनी ‘अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती’ असा त्यांचा उल्लेखही केला होता. ज्यो बायडेन हे बराक ओबामा यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. या निवडणुकीत तर ओबामा बायडेन यांचा प्रचारही करत होते.
माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी आठ वर्ष काम केलं आहे. ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. याशिवाय बायडन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.







