जळगाव – कोरोना व्हायरसने जिल्ह्यात पाय पसरले असून, जळगावातील उच्चभ्रू वस्तीत देखील प्रवेश केला आहे. यातच जिल्हा परिषदेच्या एका उच्च पदस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह संपुर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत होते. आता मात्र कोरोना थर्ड स्टेजमध्ये अर्थात कम्युनिटी स्प्रेड होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात आता जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यास देखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी ( दि 11 ) रात्री प्राप्त झाला असून, याबाबत गोपनियता पाळली जात आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणेची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी नियोजन भवनात बोलाविली होती. या बैठकीला देखील ते अधिकारी उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांच्या बंगल्यावर आठ ते दहा जण कामास येत असल्याने या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्याच्या दालनातील कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्हा परिषदेच्या इमारतीत खळबळ उडाली आहे. कर्मचारी भयभीत झाले आहेत.