जळगावातील एमआयडीसी भागातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी परिसरातील कृष्णा पॉवर्स कंपनीत मंगळवारी दि. १९ रोजी रात्री भीषण आग लागून सुमारे ५ कोटी रुपयांचे बॅटरी निर्मितीचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या १४ बंबांनी पहाटेपर्यंत केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.
एमआयडीसी, ई-सेक्टरमधील अमृत बुधाणी यांच्या मालकीची कृष्णा पॉवर नावाची बॅटरी बनवण्याची ही कंपनी आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक कंपनीला आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण कंपनीला आपल्या कवेत घेतले. या आगीत बॅटरी बनवण्याचे सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, बुधाणी यांचे अंदाजे ५ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.
मात्र, आगीचे प्रमाण मोठे असल्याने ती नियंत्रणात आणण्यात अडचणी येत होत्या. महापालिकेच्या बंबांनी आग आटोक्यात येत नसल्याने जैन इरिगेशन आणि भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल १४ अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.









